Car Loan Prepayment: आजच्या प्रगत जगात वावरत असताना हाताशी एखादी गाडी असणं ही गरज बनली आहे, किंवा स्वकष्टाने एखादी गाडी घेणं हा तुमच्या स्वप्नाचा भाग असणं यात काहीच शंका नाही. गाडी खरेदी करण्यासाठी बँकेकडून कर्ज घेणे हा सर्वसामान्यांसाठी एक सोयीस्कर पर्याय आहे. पण, गाडीच्या कर्जावरील व्याज कमी करून कर्जातून लवकर सुटका मिळवण्याचा काही मार्ग आहे का? असा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल तर ही माहिती अगदी शेवटपर्यंत वाचा.
घर कर्जाच्या बाबतीत जसा कर्जपूर्व परतफेडीचा विचार केला जातो तसाच पर्याय गाडीच्या कर्जासाठीही लागू होतो. कर्ज रकमेच्या मूळ रकमेवर (Principal) जास्त पैसे भरल्याने आपण आपली थकित रक्कम कमी करतो, यामुळे आपल्याला लागणारा व्याज कमी होतो तसेच दीर्घकालीन आर्थिक बचत होते आणि त्याचबरोबर आपण लवकर कर्जमुक्त होतो.
गाडीच्या कर्जाची थकित रक्कम मुदतीच्या आधी जमा करण्याचा विचार करताना काही महत्वाच्या गोष्टी लक्षात घ्या: (Car Loan Prepayment)
नियम जाणून घ्या. कर्ज जमा करण्यापूर्वी तुमच्या कर्जाचा करार काळजीपूर्वक वाचा. काही कर्ज देणाऱ्या संस्था मोठी रक्कम आधी जमा केल्यास prepayment penalty आकारतात. हे शुल्क समजून घेतल्याने तुम्हाला कर्ज आधी जमा करणे फायद्याचे आहे की नाही हे ठरवण्यास मदत होते.
आर्थिक नियोजन करा. कर्ज आधी जमा करण्यापूर्वी तुमच्याकडे काही अतिरिक्त रक्कम असणे आवश्यक आहे. यासाठी तुमच्याजवळ असलेल्या emergency saving, इतर कर्जे आणि भविष्यातील आर्थिक उद्दिष्टांचा विचार करा. कर्ज आधी जमा केल्याने तुमच्या एकूण आर्थिक नियोजनावर परिणाम होऊ नये यासाठी असे नियोजन करणे महत्वाचे आहे.
अचानक मिळालेल्या पैश्याचे नियोजन करा: बोनस, कर परतावा किंवा वारसाहक्काने जर का काही पैसे मिळालेले असतील तर पैश्यांमधील काही भाग तुम्ही तुमच्या गाडीच्या कर्जाची थकित रक्कम भरण्यासाठी वापरण्याचा विचार करू शकता. अचानक मिळालेल्या या पैश्याचा नीट वापर केल्याने तुमच्या कर्जाची थकित रक्कम लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते आणि तुम्ही व्याज बचत करू शकता.
गणित करा: कर्ज आधी जमा करणे हा खरोखर सर्वोत्तम पर्याय आहे का? कर्ज लवकर फेडल्याने तुम्ही जितका व्याज वाचवता तेवढा परतावा तुम्हाला इतर ठिकाणी गुंतवणूक केल्याने मिळू शकेल का? याची तुलना करा. गुंतवणूक करताना धोका, संभाव्य परतावा आणि तुमच्या पैशांची उपलब्धता (liquidity) यासारख्या गोष्टींचा विचार करा(Car Loan Prepayment).
भविष्याचा विचार करा: गाडीच्या कर्जावर लक्ष केंद्रित करताना निवृत्ती बचत, शिक्षणाचा खर्च किंवा आणीबाणीसाठीचा साठवून ठेवलेला निधी यासारख्या इतर महत्वाच्या आर्थिक उद्दिष्टांकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक नियोजनात संतुलित दृष्टीकोन ठेवा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळात आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार नाही. यासाठी तुम्ही एखाद्या तज्ज्ञाची देखील मदत घेऊ शकता.