Zomato Platform Fee Hike: सध्या ऑनलाईन मार्गाने अनेक वस्तू तसेच खाद्य पदार्थ मागवण्याची पद्धतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे आणि या सुविधेमुळे आनंदात असलेल्या ग्राहकांसाठी आजची बातमी जराशी वाईट म्हणावी लागेल. मिळालेल्या माहितीनुसार आता झोमॅटोवरील प्रत्येक ऑर्डरवर तुम्हाला 5 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क द्यावे लागेल. देशभारत सध्या अनेक कंपन्या त्यांचे तिमाही निकाल जाहीर करत आहेत आणि झोमॅटोने तिमाही निकालाच्या घोषणेपूर्वीच ही बातमी उघड केली आहे.
झोमॅटोची प्लॅटफॉर्म फी वाढली: (Zomato Platform Fee Hike)
ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म झोमॅटोने त्यांची प्लॅटफॉर्म फी 25 टक्क्यांनी वाढवून 5 रुपये प्रति ऑर्डर अशी केली आहे आणि याचा परिणाम तुमच्या खिश्यावर होईल. मात्र का? यासाठी प्लॅटफॉर्म फी म्हणजे काय हे आधी जाणून घेऊया, प्लॅटफॉर्म फी ही एक समान शुल्क आहे जे सर्व ऑर्डरवर फूड डिलिव्हरी कंपन्या ग्राहकांकडून आकारतात. म्हणजेच, आता झोमॅटोच्या या निर्णयानंतर कंपनीकडून ऑनलाइन फूड ऑर्डर करणे महाग होईल आणि प्रत्येक ऑर्डरवर तुम्हाला 5 रुपये अधिक खर्च करावे लागतील.
झोमॅटोने गेल्या वर्षी ऑगस्ट 2023 मध्ये ऑनलाईन फूड ऑर्डरवर 2 रुपयांची प्लॅटफॉर्म फी लागू केली होती आणि नंतर हेच शुल्क 3 पर्यंत वाढवण्यात आले होते जेणेकरून त्यांचे मार्जिन सुधारेल आणि अधिक नफा मिळेल. एवढंच नाही तर नवीन वर्षाच्या काळात विक्रमी ऑनलाइन फूड डिलिव्हरी ऑर्डर्समुळे झोमॅटोने जानेवारीमध्ये प्रमुख बाजारपेठांमध्ये त्यांनी प्लॅटफॉर्म फी 3 प्रति ऑर्डरवरून 4 रुपयांपर्यंत वाढवली होती (Zomato Platform Fee Hike) आणि नवीन आकडा थेट ५ रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.