Tesla In India: आपल्या भारतातील रस्त्यांवर आता लवकरच टेस्लाच्या गाड्या धावणार आहेत.अमेरिकेची प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार कंपनी म्हणजेच टेस्ला भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी वाढत असल्याने भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेतकडे वळली आहे. तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून टेस्ला भारतात येणार अश्या चर्चांना उधाण आलेलं पाहिलंच असेल, आणि आज प्रत्यक्षात टेस्ला नेमक्या कोणत्या शहरामध्ये शोरूम उघडणार याचे उत्तर मिळणार आहे.
टेस्ला भारतात येण्याची चर्चा का? (Tesla In India)
टेस्ला कंपनी दिल्ली आणि मुंबई या दोन मोठ्या शहरांमध्ये गाड्यांची प्रदर्शन कक्ष (Showroom) आणि सेवा केंद्र(Service Centers) उघडण्याच्या विचारात आहे. या प्रदर्शन कक्षांचे क्षेत्रफळ सुमारे 3,000 ते 5,000 स्क्वेअर फूट इतके असेल. भारतात इलेक्ट्रिक गाड्यांवर लागणारा आयात कर कमी करण्यात आल्याने टेस्लाला भारतात येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाले आहे.
मस्क आणि मोदींची भेट:
टेस्लाचे CEO एलॉन मस्क लवकरच भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. या भेटीमध्ये टेस्ला कंपनी भारतात गुंतवणूक करण्याची घोषणा करण्याची शक्यता असल्याच्या चर्चा सुरु आहेत. टेस्लाच्या अधिकाऱ्यांनी अनेक बांधकाम व्यावसायिकांशी चर्चा केल्या असून या चर्चांमध्ये प्रदर्शन कक्षांसाठी जागा निश्चित करण्यावर भर दिला जात आहे, कारण कंपनीला लवकरच बांधकाम सुरू करून 2024 मध्ये प्रदर्शन कक्ष उघडण्याची इच्छा आहे.
गेल्यावर्षीचा आढावा घेतला तर वर्ष 2023 मध्ये भारतात विकल्या जाणाऱ्या गाड्यांपैकी फक्त 2 टक्के गाड्याच इलेक्ट्रिक होत्या मात्र, भारत सरकार इलेक्ट्रिक गाड्यांचा वापर वाढवण्यासाठी प्रयत्नशील आहे (Tesla In India). 2030 पर्यंत भारतात विकल्या जाणाऱ्या नवीन गाड्यांपैकी 30 टक्के गाड्या इलेक्ट्रिक असाव्यात असा सरकारचा प्रयत्न असून वाढती मागणी आणि सरकारच्या धोरणांमुळे टेस्लासारख्या आघाडीच्या कंपन्यांना भारताकडे वळण्यास प्रेरणा मिळत आहे.