Tata Motors: कंपनीच्या Net Profit मध्ये वाढ; गुंतवणूकदारचे लक्ष वेधण्यात टाटा यशस्वी

Tata Motors: आपल्या देशातील आघाडीची गाड्या बनवणारी कंपनी म्हणजेच टाटा मोटर्सने चौथ्या तिमाहीत तब्बल तीन पटींनी जास्त नफा कमावला आणि कंपनीचा एकूण निव्वळ नफा वाढून 17,528.59 कोटी रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला आहे. ही जबरदस्त वाढ कंपनीच्या तीनही वाहन विभागांच्या मजबूत विक्रीमुळे झाली आणि या वाढीत विशेषत: त्यांच्या ब्रिटिश कंपनी Jaguar Land Rover ने केलेल्या कामगिरीमुळे मोठा फरक दिसून आला आहे. Jaguar Land Rover ने यंदा 11 टक्के अधिक म्हणजे 7.9 अब्ज पाउंड इतक्या विक्रीसह विक्रमी कामगिरी बजावली.

टाटाच्या गाड्यांचा सुसाट वेग: (Tata Motors)

आर्थिक वर्ष 2024 च्या संपूर्ण वर्षाचा विचार केला तर, टाटा मोटर्सचा एकूण निव्वळ नफा 1000 टक्क्यांपेक्षा अधिक वाढून 31,807 कोटी रुपये झाला आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये हा नफा केवळ 2,689.87 कोटी होता. ही अविश्वसनीय वाढ विक्री वाढणे, वाहनांच्या किमती वाढवणे आणि खर्च कमी करणे यासारख्या अनेक घटकांमुळे शक्य झाली आहे. कंपनीची आर्थिक वर्ष 2024 ची एकूण कमाई देखील 4.38 लाख कोटी रुपयांच्या विक्रमी उच्चांवर पोहोचली आहे.

टाटा मोटर्सची ही असाधारण आर्थिक कामगिरी कंपनीच्या मजबूत कार्यप्रदर्शन आणि धोरणात्मक उपक्रमांचे द्योतक आहे. येत्या काही वर्षांत कंपनीकडून इलेक्ट्रिक वाहनांवर भर दिला जाणार असून भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना मिळत असलेली वाढती मागणी यामुळे कंपनीला येणाऱ्या काळात आणखीन नफा कमावण्याची संधी चालून येईल.

टाटा मोटर्सच्या (Tata Motors) मजबूत चौथ्या तिमाही आणि आर्थिक वर्ष 2024 च्या कामगिरीमुळे त्यांनी गुंतवणूकदारांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या वर्षात कंपनीच्या शेअर्सची किंमत 100 टक्क्यांपेक्षा अधिक वाढली असून यापुढेही आणखीन वाढ होण्याची अपेक्षा विश्लेषकांनी व्यक्त केली आहे.

Leave a Comment