Share Market Today: वाढती महागाई आणि जगातील परिस्थितीच्या अनिश्चिततेमुळे भारतीय शेअर बाजाराला सलग दुसऱ्या दिवशी मोठा फटका बसला. आज Sensex आणि Nifty 50 हे दोन्ही प्रमुख निर्देशांक 1 टक्क्यापेक्षा अधिक घसरले. सकाळी Sensex 930 गुणांच्या मोठ्या घसरणीसह 73,315.16 च्या पातळीवर खुला झाला होता, तर दिवसाच्या शेवटी तो 845 गुणांनी म्हणजेच 1.14 टक्के खाली येऊन 73,399.78 च्या पातळीवर बंद झाला.
आज कसा होता बाजारी दिवस? (Share Market Today)
आज Nifty 22,339.05 च्या पातळीवर खुला झाला. दिवसभर Nifty 50 मध्ये घसरण सुरूच राहिली, त्यामुळे तो दिवसाच्या नीचांकी पातळी म्हणजेच 22,259.55 च्या पातळीवर पोहोचला. दिवसभराची एकूण घसरण 247 गुणांची म्हणजेच 1.10 टक्के एवढी असल्याने शेवटी Nifty 22,272.50 च्या पातळीवर बंद झाला.
आज Nifty 50 मध्ये फक्त सहाच कंपन्यांचे शेअर्स वाढले(Share Market Today). यात ONGC , हिंडाल्को, मारुती, नेस्ले, ब्रिटानिया आणि भारती एअरटेलचा समावेश होता. संपूर्ण दिवसाच्या कार्यकाळात Nifty 50 मधील श्रीराम फायनान्स, विप्रो, ICICI Bank, बजाज फायनान्स आणि बजाज फिनसर्व्ह हे शेअर्स सर्वात जास्त खाली आले.
या घसरणीची झळ Midcap आणि Small cap निर्देशांकांना देखील बसली. आज BSE Midcap निर्देशांक 1.50 टक्के आणि Small cap निर्देशांक 1.54 टक्क्यांनी घसरला.आज BSE वर नोंद असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल जवळपास 494.7 लाख कोटींवर आले, म्हणजे फक्त एका दिवसात गुंतवणदारकांना जवळपास 5 लाख कोटी रुपयांचा तोटा झाला आहे.