Gold Price: जगभरात जवळपास सर्वत्र सोनं हे समृद्धीचं प्रतीक मानलं जातं, मात्र गेल्या काही वर्षांपासून सोनं मोठ्या प्रमाणात किंमत वाढीला सामोरे जात आहे. भारतात तर सोन्याचे एक वेगळेच स्थान आहे, कारण कोणत्याही मोठ्या सणासमारंभाला किंवा लग्नाला सोन्याच्या दागिन्यांची भेट नसली तर तो उत्सव अपूर्णच ठरतो जणू. याचबरोबर, सोने हे ‘सुरक्षित गुंतवणूक’ म्हणूनही ओळखले जाते पण अचानक या किमती का वाढत आहे? असा प्रश्न जर का तुम्हालाही सतावत असेल तर ही बातमी वाचा..
सोन्याच्या किमती का वाढतायत?(Gold Price)
कदाचित गेल्या 7 वर्षांत सोन्याची किंमत दुप्पटीने वाढली आहे आणि तज्ज्ञांच्या अंदाजानुसार, येणाऱ्या दिवसांमध्ये ही दरवाढ कायम राहण्याची शक्यता आहे. यंदाच्या दिवाळीपर्यंत सोने प्रति 10 ग्रॅम 74,000 रुपये ओलांडू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या वाढत्या दरामागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्वाचं म्हणजे सध्या जगातील केंद्रीय बँकांनी मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केलं आहे आणि म्हणूनच केंद्रीय बँकांकडे 1,037 टन एवढा सोन्याचा साठा आहे. याशिवाय, इजरायल, हमास, रशिया आणि युक्रेन यांच्यासह पश्चिम आशियातील वाढत्या तणावांच्या भीतीमुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याची मागणी वाढत आहे.
भारतात सोन्याचे भाव वाढलेत:
आपल्या भारत देशात सुरू असलेल्या लग्नसरावामुळे भारतात सोन्याची मोठी मागणी आहे. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत कमी असल्याने सोन्याची आयात महाग झाली आहे आणि यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. भारतीय लोकांना सोन्याची विशेष आवड असतेच आणि भारतात गुंतवणूक म्हणूनही सोन्याचे अतिशय महत्व प्राप्त आहे. जूनपर्यंत चालणाऱ्या या लग्नसरावामुळे सदर काळात मोठ्या प्रमाणात सोने खरेदी केली जाईल आणि यामुळे सोन्याची मागणी आणखीन वाढू शकते.
जगातभर मंदी असताना सोन्याच्या आणि चांदीच्या किंमती वाढतात आणि वरती नमूद केल्याप्रमाणे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने हा सर्वोत्तम पर्याय मानला जातो(Gold Price). अर्थव्यवस्था वेगाने वाढायला सुरुवात झाली की सोन्याच्या दरात घट होते, त्यामुळे येत्या काळात सोन्याची किंमत आणखी वाढेल की कमी होईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.