Auto Sweep Service: अनेकवेळा आपल्या बँकेच्या खात्यात काही प्रमाणात पैसा पडून राहतोच, आपण काही त्याचा पुरेपूर वापर करत नाही. मात्र विचार करा अश्या बाकी राहिलेल्या आणि न वापरात आणलेल्या पैश्यांवर तुम्हाला व्याज मिळालं तर? हो!! तुम्ही अगदीच बरोबर माहिती वाचताय, अश्या पैश्यांवर व्याज मिळवणं शक्य आहे, मात्र त्याची रक्कम काही भरगोस नसते एवढं लक्ष्यात ठेवा. मग या पैशावर जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी काय करता येईल? तर यावर एक सोपा उपाय म्हणजे बँकेची ‘Auto Sweep’ सुविधा.
Auto Sweep Service काय आहे?
बँका आपल्या ग्राहकांना भरपूर नफा कमावता यावा म्हणून अनेक सुविधा पुरवतात पण त्यापैकी काही आपल्या लक्षात येत नाहीत किंवा आपल्याला त्याबद्दल माहिती नसते. आज आपण बँकच्या अश्याच एका सोयीस्कर सुविधेबद्दल जाणून घेणार आहोत, ती म्हणजे बँकची ‘Auto Sweep’ सेवा. या सेवेद्वारे आपल्या बचत खात्यातील अतिरिक्त रकमेवर आपण Fixed Deposit (FD) इतकेच व्याज कमवू शकता.
हे कसं शक्य आहे?
या सेवेद्वारे आपण आपल्या खात्यावर एक मर्यादा ठरवून देतो. जर खात्यातील रक्कम या मर्यादेपेक्षा जास्त असेल तर ‘Auto Sweep’ सुविधेचा वापर करता येतो. उदाहरणार्थ, आपण ही मर्यादा 20,000 रुपये ठरवली आणि जर का तुमच्या खात्यात 60,000 रुपये जमा केले तर 20,000 पेक्षा जास्त असलेली रक्कम म्हणजेच 40,000 रुपये Fixed Deposit मध्ये जमा होतील आणि या 40,000 रुपयांवर Fixed Deposit वरील व्याज दर मिळेल, तर उर्वरित 20,000 रुपयांवर बचत खात्याचे व्याज मिळेल.
याचा फायदा काय?
Fixed Deposit वरील व्याज हे बचत खात्याच्या व्याजापेक्षा जास्त असते. म्हणजेच आपल्या पैशावर अधिक परतावा मिळतो. सोबतच आपल्याला FD ची मुदत पूर्ण होण्याची वाट पाहावी लागत नाही. आपल्या गरजेनुसार आपण ही रक्कम कधीही परत काढून घेऊ शकता(Auto Sweep Services).
फक्त एवढंच नाही तर ‘Auto Sweep Service’ मुळे आपला पैसा एका शिस्तबद्ध पद्धतीने जमा होतो. इथे आपल्या खर्चाचा मागोवा घेता येतो आणि बजेटही आखता येते. शिवाय Fixed Deposit मध्ये पैसे ट्रांसफर करण्याचा त्रास इथे वाचतो कारण ही एक पूर्णपणे स्वयंचलित प्रक्रिया आहे.