Apple iPhone Export: जगातील नामांकित कंपन्यांचा चीनवरचा विश्वास कोरोना महामारीनंतर घसरत चालला आहे, याउलट भारतावरचा विश्वास मात्र वाढत आहे आणि ही गोष्ट आपल्यासाठी महत्वाची ठरते. या बदलाचा फायदा भारताला आणि भारतीय अर्थव्यवस्थेला होतो. अनेक कंपन्यांनी आपली उत्पादन केंद्र चीनमधून भारतात हलवली आहेत आणि याचाच परिणाम म्हणून टेस्लाचे मालक एलॉन मस्क 22 एप्रिल रोजी भारतात येणार असून त्यांच्या या दौऱ्यामध्ये ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.
iPhoneची भारताला पसंती: (Apple iPhone Export)
टेस्ला भारताच्या झपाट्याने वाढणाऱ्या बाजारपेठेचा फायदा घेण्यासाठी येथे आपली उत्पादन युनिट स्थापन करण्याचा विचार करत आहे. मात्र याआधी आयफोन बनवणाऱ्या Appke कंपनीनेही भारतात आपले उत्पादन सुरू केले होते आणि या निर्णयाचा Appleला फायदा झाला. ट्रेड व्हिजन फोरमच्या माहितीनुसार, आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारतातून होणाऱ्या iPhoneच्या निर्यातीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या आर्थिक वर्षात हा आकडा 6.27 अब्ज डॉलर होता, तो आता 12.1 अब्ज डॉलर इतका झाला आहे.
या वाढीमध्ये ॲपलची भारतात वाढती उपस्थिती, उत्पादन व्यवस्थेचा विकास आणि नाविन्यपूर्णता यांचा मोठा वाटा आहे, असे ट्रेड व्हिजन म्हणते. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 6.27 अब्ज डॉलर इतक्या रकमेवरून आर्थिक वर्ष 2023-34 मध्ये ती 12.1 अब्ज डॉलरवर पोहोचली, म्हणजे जवळपास दुपटीने वाढ झाली आहे. ट्रेड व्हिजनच्या मते हे आकडे भारताची आता Appleच्या जागतिक पुरवठा साखळीमध्ये प्रमुख भूमिका (Apple iPhone Export) आहे हे स्पष्ट करतात.