Airline Rules: विमान प्रवासातील प्रवाशांच्या सोयीसाठी नागरी उड्डाण नियामक (DGCA) कडून विमान कंपन्यांसाठी एक नवीन आदेश जारी करण्यात आला आहे. या नवीन आदेशानुसार, 12 वर्षाखालील मुलांना विमानात बसण्यासाठी जागा दिली जाणे आवश्यक केले गेले आहे.
विमान कंपन्यांना मिळाला आदेश: (Airline Rules)
DGCA ने जारी केलेल्या नवीन आदेशानुसार मुलांचा प्रवास त्यांच्या पालकांसोबत असेल आणि जर का तो प्रवास एकाच PNR वर असेल तर त्यांना बसण्याची जागा विमान कंपनीने द्यावी, तसेच याची नोंद देखील ठेवण्याचे आदेश DGCA ने दिले आहेत. गेल्या काही दिवसांत 12 वर्षाखालील मुलांना त्यांच्या पालकांसोबत बसण्याची परवानगी न दिल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या, आणि यानंतर यावर उपाय म्हणून DGCA कडून हा आदेश जारी करण्यात आला आहे.
DGCA ने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, 12 वर्षाखालील मुले पालकांसोबत प्रवास करत असल्यास, पालकाच्या जवळच बसण्याची जागा मुलाला मिळेल आणि या जागेसाठी विमान कंपनीला कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारता येणार नाही. इतर सेवांसाठी विमान कंपन्या ‘OPT IN’ सेवे अंतर्गत काही शुल्क आकारू शकतात. मात्र, मुलाच्या जागेसाठी विमान कंपनी असा आग्रह करू शकणार नाही.
या नियमानुसार जर पालकांनी स्वतःसाठी मोफत जागा किंवा Auto Allocation ची निवड केली असेल तर मुलासाठीही अशीच जागा उपलब्ध करून द्यावी लागेल(Airline Rules). या आदेशामुळे 12 वर्षाखालील मुलांसह प्रवास करणाऱ्या पालकांना आता थोडा दिलासा मिळणार आहे.