Air India Express: तुम्ही हवाई प्रवासी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे, कारण Air India Express च्या प्रवाशांना हवाई प्रवासाच्या योजनांमध्ये एक मोठा धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टाटा समूहाची मालकी असलेल्या Air India Express च्या अनेक कर्मचाऱ्यांनी आज सकाळी अचानक आजारपणाचे कारण सांगून अचानक रजा घेतल्यामुळे तब्बल 70 पेक्षा जास्त उड्डाणे रद्द करावी लागली आहेत, इतकेच नाही तर काही उड्डाणे उशिरा सुरु होणार आहेत.
Air India Express ची विमान सेवा अडकली:
सूत्रांनुसार, Air India Express च्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या व्यवस्थापनावर असहमती व्यक्त करण्यासाठी सामूहिकरित्या आजारपत्र (Sick Leave) दाखल केले. विशेष म्हणजे, Air Asia आणि Air India Express यांच्या विलीनीकरणाच्या प्रक्रियेमुळे कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून असंतोष पसरला होता.
Air India Express कर्मचाऱ्यांच्या एका गटाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनियनने गेल्या महिन्याच्या अखेरपासूनच कंपनीविरोधात आरोप करायला सुरुवात केली होती. ज्यामध्ये कंपनीचे व्यवस्थापन चुकीचे आहे आणि कर्मचाऱ्यांशी समानतेने वागवले जात नाही असे आरोप करण्यात आले होते. या युनियनमध्ये जुन्या कर्मचाऱ्यांचा अधिक समावेश असून ते सुमारे 300 कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात.
यावर कंपनीची प्रतिक्रिया काय?
Air India Express कडून याबाबत प्रतिक्रिया देताना असे सांगण्यात आले की, “सगळ्यात अगोदर आम्ही आमच्या विमान प्रवाशांची झालेल्या गैरसोयीबद्दल माफी मागतो. सध्या आमच्या कर्मचाऱ्यांशी बोलून या समस्येमागील कारणांची माहिती घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, यामुळे आमच्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू.”
Air India Express च्या या घटनेच्या अगोदरच टाटा समूहाची दुसरी विमान कंपनी असलेल्या Vistara ने देखील वैमानिकांच्या कमतरतेमुळे आपली उड्डाण क्षमता 10 टक्क्यांनी कमी केली होती (Air India Express) आणि यामुळे दररोज 25-30 उड्डाणे रद्द करावी लागली होती.