Air India Express: गेल्या दोन दिवसांपासून टाटा समूहाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रसिद्ध Air Indiaची उपकंपनी, Air India Express विमानसेवा कंपनीत मोठा गोंधळ उडाला होता. 7 मे रोजी कंपनीच्या 100 पेक्षा जास्ती विमानसेवक कर्मचाऱ्यांनी अचानक आजारपत्र दाखल केल्याने या गोधळाला सुरुवात झाली, आणि परिणामी 80 पेक्षा जास्ती विमान प्रवास रद्द करावे लागले होते. 8 मे रोजी या संपात सहभागी असलेल्या 25 विमानसेवक कर्मचाऱ्यांना कंपनीने नोकरीवरून बेदखल केल्याने आणखी असंतोष निर्माण झाला होता.
कर्मचारी आणि कंपनीमध्ये चर्चा:(Air India Express)
या संपूर्ण प्रकरणानंतर सुमारे 10 तासांची चर्चा झाली, ज्यात विमान कंपनी व्यवस्थापन आणि संपात सहभागी कर्मचारी यांच्यात करार झाला. या चर्चेत कंपनीने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा नोकरीवर घेण्याबद्दल तसेच वेतन, भत्ता यांच्याशी संबंधित मागण्यांवर विचार करण्याच्या प्रस्तावाला कंपनीने मान्यता दिली. तर दुसरीकडे, विमानसेवक कर्मचाऱ्यांनी संप थांबवून कामाला परत येण्यास सहमती दर्शविली आहे.
या संपामुळे Air India Express च्या कारभारात मोठी गडबड उडाली असून, कंपनीला कोट्यवधी रुपयांचा तोटा झाल्याचा अंदाज आहे आणि म्हणूनच विमान कंपनी आता आपले कार्यालय पूर्वपदावर आणण्यासाठी आणि प्रवाशांचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. Air India Express आणि त्यांच्या विमानसेवक कर्मचाऱ्यांमधील हे वादळ आता शांत झाले आहे. मात्र आता करारानुसार कंपनी मागण्यांवर किती गांभीर्याने विचार करते आणि त्यांची अंमलबजावणी कशी केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.